मुंबई - मुंबई महानगरपालिकेद्वारे बोरिवली येथील जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम ५ आणि ६ मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बोरिवली आणि दहिसर या विभागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा राहणार बंद : महापालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील आर/मध्य विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम गुरुवार ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपासून शुक्रवार ६ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कालावधीत आर/ मध्य बोरिवली व आर /उत्तर दहिसर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्यांचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
'या' विभागात पाणीपुरवठा बंद : बोरिवली विभाग - चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण. बोरिवली (पश्चिम) विभाग - सायंकाळी ७.१० ते रात्रौ ९.४० आणि सकाळी ११.५० ते दुपारी १.५० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, ६ मे २०२२ रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. दहिसर विभाग : एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभाग रात्री ९.४० ते रात्री ११.५५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र,६ मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत घट; सोमवारी ५६ नवे रुग्ण