मुंबई महाराष्ट्रासह देशभरात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 2346 जनावरांना लंपी रोगाची लागण झाली. तर 1435 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे. या आजारामुळे 42 जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय बरकाळे यांनी दिली.
असा ओळखावा आजार लंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात विविध राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. हा आजार फक्त गाय आणि म्हैशींनाच होतो. या आजारात गाई म्हशींना 104-105 फॅरेनाईट ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. तसेच कष्टाळू म्हणजे बैलासारख्या प्राण्यांना अशक्तपणा येतो. अनेकदा जनावरे लंगडतात देखील आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ मोठ्या गाठी येतात. या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. तसेच त्या सर्वांगावर देखील पसरू शकतात. एवढेच नाही तर जनावरांच्या अंतर्गत भागांमध्ये देखील गाठी येतात.
या नंबरवर संपर्क साधा लंपी पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. यामध्ये पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन बरकाळे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यात लंपी रोगाचा शिरकाव राज्यातील ग्रामीण भागात लंपी रोगाने अक्षरशः थैमान घातले असून ठाणे जिल्ह्यातही या रोगाचा शिरकाव होऊन डझनभर जनावरांना लागण झाल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील तीन, अंबरनाथ तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील आठ जनावरांचा समावेश आहे.
साताऱ्यात लंपी नियंत्रणात संसर्गजन्य रोगाने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पशुधनाचा बळी घेतला आहे. वाघेरी ता. कराड येथील शेतकरी सुलतान फतुलाल पटेल यांच्या खिलार जातीच्या बैलाचा सोमवारी सायंकाळी लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. या घटनेचा तातडीने पंचनामा करण्याची सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना केली आहे. सातारा जिल्ह्यात ५५ जनावरांना लागण. जनावरांचे बाजार, शर्यतीवर निर्बंध घालण्यात आहे आहेत.
जऴगावात 29 जनावरांचा मृत्यु जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी जनावारांस लंपीची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यानंतर राज्यातील १८५ जिल्ह्यातील जनावरांना लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत २९ जनावरांचा लंपीची लागण झाल्याने मृत्यू झाला.
मुंबईत गो शाळा - तबेल्यांवर लक्ष महाराष्ट्रात वेगाने पसरणाऱ्या लंपी आजाराचा शिरकाव मुंबईत होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य, किटक नाशक व देवनार पशुगृह विभागाने मुंबईतील गो शाळा, तबेल्यांची तपासणी सुरु केली आहे. तपासणीत गो शाळेत, तबेल्यात अस्वच्छता आहे का हे पाहिले जाणार आहे. अस्वच्छता आढळल्यास पालिकेकडून नोटीस बजावली जाणार आहे. संबंधित गो शाळा किंवा तबेला मालकाला पालिकेच्या किटक नाशक विभागाकडून औषध फवारणी करुन घेणे बंधनकारक असणार आहे. मुंबईत अजूनही लंपीची लागण झाल्याचे निदान झालेले नाही. मात्र, खबरदारी म्हणून देवनार पशुगृह गोशाळा, तबेल्यांवर लक्ष ठेवले जात आहे, असे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक के. एल. पठाण यांनी सांगितले.
रोग आटोक्यात आणण्यासाठी काय कराल ? लंपी रोग आटोक्यात आणण्यासाठी गोठयांमध्ये धुर करून गोमाशा नष्ट होऊ शकतात. त्याचप्रमाणे रोगी जनावराला दुसऱ्या जनावरांपासून दूर ठेवावे आणि रानामाळात न सोडता गोठ्यातच बांधावे. तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर लावून रोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा रोग म्हशींमध्ये आढळून आला नसल्याची महत्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली असून लंपी रोगाची लक्षणे दिसून आलेल्या जनावरांची माहिती तूर्तास नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.