मुंबई - विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी आज (सोमवार) अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीसह भाजप आणि इतर पक्षांकडून तब्बल २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे पर्यायी उमेदवार म्हणून भरण्यात आले आहेत. तसेच अपक्ष उमेदवारांची संख्या देखील लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आमदार धोंडिराम राठोड यांचे चिरंजीव राजेश राठोड यांचा उमेवारी अर्ज भरला आहे.
भाजपकडून यापूर्वीच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहीते पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपचडे यांचे उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर आज भाजपकडूनच पर्यायी उमेदवार म्हणून इतर चार जणांचे अर्ज भरुन ठेवले असून त्यांची माहिती सायंकाळपर्यंत जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा... विधान परिषद निवडणूक : भाजपच्या चार उमेदवारांसह 2 डमी उमेदवारांचे अर्ज दाखल
संख्या बळानुसार विधानपरिषदेच्या नऊ जागांपैकी पाच जागा या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात. तर उर्वरित चार जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडून स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महत्वाचे म्हणजे सायंकाळपर्यंत किमान २५ हून अधिक अर्ज भरले जाण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा... विधान परिषद निवडणूक: शिवसेनेच्या इतिहासात पाहिल्यांदाच पक्षप्रमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल