मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता
188 कर्मचाऱ्यांना वाचवले
तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. त्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी एकूण 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 22 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत.
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यात मदत केली होती. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली.