मुंबई - विधान परिषदेमध्ये सुमारे २१ हजार ७६ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. विरोधकांनी गदारोळ घालत सभात्याग केला, त्यानंतर पुरवणी मागण्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर करून घेतल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा आणि विधीग्राहीकरण विधेयक, महाराष्ट्र गुंठेवारी विकास सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक २०२१ ला देखील मंजुरी देण्यात आली.
विरोधकांचा सभात्याग
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, सरकारकडून वर्ष २०२०-२१ साठी रु. २१,०७६ कोटींच्या पूरक मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. तब्बल अडीच तास पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. विरोधकांनी कोरोना काळात नागरिकांना भोगाव्या लागलेल्या यातनांचा पाढा वाचत, जिल्हा, तालूका स्तरीय रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची मागणी केली. लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मच्छिमारांचे हाल सुरू आहेत. अशा विविध समस्या यावेळी विरोधकांनी सभागृहासमोर मांडल्या. यावर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र यावर सत्ताधाऱ्यांनी विशेष बैठक घेऊ अशी सूचना केल्याने, विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर पूरक मागण्यांना मंजुरी देण्यात आली.