मुंबई - महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने गुजराती मतदारांना आपलंस करायला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये गुजराती समाजाची संख्या मोठी आहे. आतापर्यंत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढवत असल्याने हा मतदार शिवसेना-भाजप युतीकडे पाहायला मिळत होता. आता मात्र महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेने गुजराती मतांची बांधणी करण्यासाठी सुरुवात केली.
नवीन शिवसेना गुजराती गीत लाॅन्च-
शिवसेना संघटक हेमराज भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आज मालाड येथे गुजराती बांधवांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये 21 उद्योगपती आणि व्यावसायिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नवीन शिवसेना गुजराती गीत लाॅन्च करण्यात आले. तसेच जलेबी फाफडा व रास गरबा आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका राजुला पटेल यांनी देखील गरब्यावर ताल धरून आनंद घेतला. यावेळी गुजराती नागरिकांसाठी शिवसेना किती चांगले काम करत आहे, हे पटवून देऊ असे संघटक हेमराज शाह यांनी सांगितले.