मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध खंडणीचा गुन्हा मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आला होता. व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात मरीन लाईन पोलीस स्टेशनकडून हे प्रकरण SIT कडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणातील आरोपपत्र किल्ला कोर्टात आज दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - Ajit Pawar : अजितदादांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा अन् जावयाचा हट्ट
श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सीआयडीने या प्रकरणात किल्ला कोर्टामध्ये दोन हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सीआयडीने या प्रकरणात चार जणांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये संजय पुनामिया, सुनील जैन, पीआय नंदकुमार गोपाले आणि पीआय आशा कोरके यांच्या नावाचा समावेश आहे. या चार्जशीटमध्ये 50 पेक्षा अधिक जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात पीआय नंदकुमार गोपाले आणि पीआय आशा कोरके या माजी पोलीस अधिकाऱ्यांना सीआयडीकडून 8 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण
श्यामसुंदर अग्रवाल खंडणी प्रकरणातील तक्रारीमध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे देखील नाव आहे. मात्र, आज सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये परमबीर सिंग यांचे नाव देण्यात आले नाही. कारण, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना या संदर्भात अभय दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, परमबीर सिंग यांची कोणत्याही प्रकरणात पोलीस चौकशी करू शकते. मात्र, चार्जशीट किंवा कठोर कारवाई करता येणार नाही, असे निर्देश देण्यात आले असल्याने या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचे नाव देण्यात आले नाही.
काय आहे प्रकरण?
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाणसह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात CID ने निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक, आज 15 हजार नव्या कोविड रुग्णांची नोंद