मुंबई - तामिळनाडूच्या नागरिकांना आज आपल्या गावी जाण्यासाठी सीएसटीहून दोन रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. अनेक दिवसांपासून तामिळनाडू येथील कामगार धारावी, सायन कोळीवाडा, लेबर कॅम्प या ठिकाणी लॉकडाउनमुळे अडकलेले होते. त्यांना आज तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने त्यांच्या गावी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार कॅप्टन सेल्वन यांनी दिली आहे.
तामिळनाडूला जाण्यासाठी सीएसटीवरुन ट्रेन सोडली जाणार असल्यामुळे आज दुपारपासून नागरिक मोठ्या संख्येने रांगेत जमले आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केली होती. परंतु, तामिळनाडू सरकारने त्यांना येण्यास परवानगी नाकारल्यामुळे ते फार चिंतित झाले होते. त्यांनी तामिळनाडू सरकारवर राग व्यक्त केला होता. पण लोकांच्या मागणीनुसार तामिळनाडू सरकारने येण्याची परवानगी दिल्यामुळे आज सीएसटीहून दोन गाड्या तामिळनाडूला रवाना होणार आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गणली जाणारी धारावी आज कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत गेल्या दोन महिन्यात कोरोनाचे 1500 हून अधिक रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, तर मृतांचा आकडा 60 वर पोहोचला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व बंद आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या सर्वांचे रोजगार नसल्यामुळे आणि उपासमारीने हाल होत आहेत. येथील काही परप्रांतीय पायी, मिळेल त्या वाहनाने गावी पोहोचले. पण तामिळनाडूमधील लोकं अजूनही मोठ्या प्रमाणात येथे अडकले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जाण्याची व्यवस्था करत केंद्र सरकारकडे त्यांनाही ट्रेन सोडण्याचा निर्णय अगोदर दोन दिवसांपूर्वी घेतला होता. परंतु, तामिळनाडू राज्य सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे तामिळनाडूवासीयांचे जाणे रखडले होते.
तामिळनाडूला जाणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काल तामिळनाडू व महाराष्ट्र राज्याच्या सहकार्याने आज दोन रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धारावीतील, सायन कोळीवाडा येथील तामिळनाडू येथे राहणारे सर्व धारावी जंक्शन येथे रांगेत सीएसटीला जाण्यासाठी रांग लावताना दिसले. आज रात्री मुंबईतून दोन श्रमिक ट्रेन तामिळनाडूला रवाना होणार आहेत. यासाठी दुपारपासूनच लोकांनी धारावी, सायन येथे रांगा लावत सीएसटीला पोहोचण्यासाठी तयारी करताना दिसले. प्रत्येक व्यक्तींचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याला स्थानकात पाठवण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. चेकिंग करताना विलंब होऊ नये, म्हणून लोकं अगोदरच पोहोचत आहेत. तामिळनाडू येथील नागरिक अनेक दिवसांपासून धारावी सायन कोळीवाडा या परिसरात अडकलेली आहेत. त्यांना आज आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिक आनंदित झाल्याची माहिती आमदार सेल्वन यांनी दिली.