मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सतत वाढत आहेत. मुंबई परिसरातील आज नव्या दोन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका २२ वर्षीय महिलेसह उल्हासनगरातील ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मुंबई परिसरात दोन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता मुंबई परिसरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ झाली आहे. यात मुंबईमधील ९ तर मुंबईबाहेरील ९ रुग्ण आहेत.
मुंबईमधील एका रुग्णाचा १७ मार्चला मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील ८ तर, मुंबईबाहेरील ९ अशा एकूण १७ रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून तो गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती पालिकेच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
चीनच्या वुहान प्रांतातून फैलाव सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा आता जगभरात प्रसार झाला आहे. या विषाणूच्या संसर्गाने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा भारतातही प्रादुर्भाव झाला असून याचे रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईतही आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गेल्या २४ तासात ३८४ बाह्यरुग्ण तपासण्यात आले. यादरम्यान, १०६ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी मुंबईमधील एक आणि मुंबईबाहेरील एक अशा दोन रुग्णांना कोरोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत कालपर्यंत कोरोनाच्या १७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात आज दोन रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबईमधील एका २२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तिने लंडनमध्ये प्रवास केला आहे. तिला १८ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, उल्हास नगर येथील एका ४७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेने दुबईचा प्रवास केला आहे.
कस्तुरबा रुग्णालयातून ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या रुग्णालयात १०० रुग्ण भरती असल्याचे दक्षा शाह यांनी संगितले. सेव्हन हिल रुग्णालयात ९६, मिराज हॉटेलमध्ये ६ तर निरंता हॉटेलमध्ये ७ अशा एकूण १०९ आंतरराष्ट्रीय रुग्णांना होम क्वारन्टाईन करून ठेवण्यात आले आहे, असे शाह यांनी सांगितले. २३ जानेवारीपासून कस्तुरबा रुग्णालयात ३ हाजर १४२ बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५० रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यापैकी ६२९ रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एक जण गंभीर -
कस्तुरबा रुग्णालयात एक ६८ वर्षीय वृद्ध कोरोनाची लागण झाल्याने दाखल झाला होता. त्याच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्लड प्रेशर, डायबेटीस आदी आजार असल्याने त्या रुग्णाची प्रकृती गेले काही दिवस गंभीर आहे. त्याला गेले काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - एसीचा वापर टाळा, राज्य सरकारचे तातडीचे परिपत्रक
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : रो-रो सेवेच्या फेऱ्या बंद; 'मुहूर्त' चुकल्याची' नागरिकांमध्ये चर्चा !