मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेतर्फे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. विविध वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. महापालिकेकडून २५ मे पासून स्तनदा माता आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जात आहे. मात्र आता केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे लसीकरण करण्याचे घोषित केले. त्यानुसार गुरूवारी मुंबईत ३५ केंद्रांवर १८ गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम -
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचारी, जेष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारने १९ मेला घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने २५ मे पासून स्तनदा मातांचे लसीकरण सुरू करण्यात आले. याचवेळी महापालिकेने गर्भवती महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते.
३६४६ स्तनदा, गर्भवती मातांना लस -
पालिकेने केलेल्या आवाहनाला १५ जुलैपर्यंत ३ हजार ६४६ स्तनदा माता आणि गर्भवती मातांनी प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले आहे. गुरूवारपासून केंद्र सरकारने गरोदर मातांना लस देण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार गुरूवारी ३५ केंद्रांवर गरोदर मातांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याला १८ गरोदर महिलांनी प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले आहे.
स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आवश्यक -
कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल अशा गरोदर स्त्रियांना त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या लेटरहेडवर लस देण्याबाबत लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञाकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागते. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि स्वतःचे संमतीपत्र लसीकरण केंद्रांवर दिल्यावर गरोदर मातांना लस दिली जाते. गरोदर महिलांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना रांगेशिवाय लसीकरण केले जात आहे.
आतापर्यंत ६३ लाख लाभार्थ्यांना लस -
मुंबईत १६ जानेवारीपासून १५ जुलैपर्यंत ६३ लाख ५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ४९ लाख १ हजार ४९३ लाभार्थ्यांना पहिला तर १३ लाख ९८ हजार ५५७ लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ७ लाख १ हजार २५३, ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना १५ लाख १० हजार ९७०, ४५ ते ५९ वयोगटातल्या १८ लाख ७४ हजार ८००, १८ ते ४४ वयोगटातल्या २१ लाख ९७ हजार २६३, स्तनदा मातांना ३६४६, गर्भवती महिलांना १८, परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी - परदेशी नोकरीसाठी जाणारे नागरिक, टोकियो ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू, मानसिक रुग्णांना ५४१, ओळखपत्र नसलेले जेलमधील कैदी तृतीय पंथी यांना १०९ लसीचे डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा - पाच भारतीय मुल अडकली इराणमध्ये, सुटका करण्याची भारत सरकारकडे केली मागणी
हेही वाचा - कार्गो सेवेमुळे जिनोमिक सिक्वेन्सिंगचे यंत्र अडकले परदेशात, मुंबईत केल्या जाणाऱ्या चाचण्यांना होणार उशीर