मुंबई - देशभरात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमुळे स्थगितीनंतर मंगळवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईमधील पालिकेच्या ९ केंद्रांवर ४ हजार लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. मात्र, ७०० लोकांची नावे दुबार आल्याने ती वगळून ३३ बुथवर ३३०० लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी १७२८ म्हणजेच ५२ टक्के लोकांना आज (बुधवारी) लसीकरण करण्यात आले. आजच्या लसीकरणादरम्यान ७ जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाला सुरुवात -
मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. गेल्या दहा महिन्यांत कोरोनाला थोपवताना आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, पालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली आहे. यातच शनिवार १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून लसीकरणाला सुरुवात केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ झाला. पालिकेच्या ९ आणि राज्य सरकारच्या एक अशा एकूण १० केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र, कोविन अॅपवर तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती.
इतके झाले लसीकरण -
शनिवारी १६ जानेवारीला १९२६ लोकांना लस देण्यात आली होती. मंगळवारी १९ जानेवारीला लसीकरणादरम्यान ३२०० पैकी १५९७ लोकांना लस देण्यात आली. आज ३३०० पैकी १७२८ लोकांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात ३६२, सायन येथील टिळक रुग्णालयात १३५, विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात १४९, नायर रुग्णालयात १५४, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात ५७, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ३०६, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात २६२, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १५५ आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात १३३ तर जेजे रुग्णालयात १५ जणांना लस दिली.
७०० नावे दुबार -
मुंबईत ९ केंद्रांवर ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार होती. मात्र त्यापैकी तब्बल ७०० कर्मचाऱ्यांची नावे आजच्या लिस्टमध्ये दुबार आल्याचे निदर्शनास आले आहे. दुबार आलेली ७०० नावे वगळून आज ३३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.