मुंबई - दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या गुजरातमधील अवघ्या साडेपाच महिन्यांच्या धैर्यराजला १६ कोटी रुपयांचे ‘झोलजेन्स्मा’ इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या चिमुरड्याचे प्राण वाचले आहे. धैर्यराजला मदत करणाऱ्या गुरातसह देशभरातील नागरिकांचे धैर्यराजच्या पालकांनी ईटीव्ही भारतच्या माध्यमातून आभार मानले.
धैर्यराजच्या पालकांनी मानले आभार
धैर्यराजला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी (एसएमए) हा आजार झाला होता. धैर्यराजच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. त्यामुळे धैर्यराजचे प्राण वाचविण्यासाठी समाज माध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करून 'क्राऊड फंडिंग'ची मोहीम चालवली. या मोहिमेला गुजरातसह देशभरातून प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या ७१ दिवसात १६ कोटी २४ लाख ३५ हजार ६५५ रुपये जमा झाले. तसेच कोट्यवधीच्या या औषधावरील सीमा शुल्कही केंद्र सरकारने माफ केले आहेत. त्यामुळे धैर्यराजचे प्राण वाचले आहेत. धैर्यराजचे वडील राजदीप सिंह राठोर यांनी लाखो दात्यांचे आभार मानले आहे. तसेल मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफचे आभार मानले आहेत.
नेमका कोणता आजार?
हिंदुजा रुग्णालयाच्या चाईल्ड न्युरोलोजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की धैर्यराजला 'स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी' (एसएमए) हा दुर्मीळ आणि दुर्धर आजार झालेला आहे. या आजारामध्ये, प्रोटीन तयार करण्यासाठी शरीरामध्ये जो जीन असणे अपेक्षित असते, तो नसल्याने गुंतागुंत निर्माण होते. या स्थितीमध्ये मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे अवघड होते. तसेच इतर हालचालींवरही अनेक बंध येतात. ही परिस्थिती टप्प्याटप्याने अधिक गुंतागुंतीची होत जाते. त्यामुळे या दुर्मीळ आजारावर जीन थेरेपी करावी लागते. यासाठी ‘झोलजेन्स्मा’ इंजेक्शन लागते. या इंजेक्शनची किंमत १६ कोटी रुपये आहेत. हे इंजेक्शन अमेरिकेत तयार केले जाते. त्यामुळे या आजारावर उपचारासाठी खर्च फार मोठा आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना झेपणारा हा खर्च नाहीत. धैर्यराजसाठी नागरिकांनी मदत केली आहेत. त्यामुळे आज धैर्यराजचे प्राण वाचले.
धैर्यराजला मिळाली सुट्टी
‘झोलजेन्स्मा’ नावाचे इंजेक्शन हे अमेरिकेतून मागविण्यात आले आहे. तब्बल १५ दिवसनांतर इंजेक्शन मुंबईत दाखल झाले होते बुधवारी सकाळी ११ वाजता धैर्यराजला हे इंजेक्शन देण्यात आले. धैर्यराज २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती सामान्य आहे. धैर्यराजला गुरुवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहेत.
हेही वाचा - गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू