मुंबई - गोरेगावातील आरे कॉलनीमध्ये बिबट्याने आज(शनिवारी) पुन्हा 14 वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बिबट्याने मुलाच्या गळ्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 मध्ये ही घटना घडली आहे.
आरे कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून हल्ले करण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यातच आज आणखी एक बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याने मुलावर हल्ला केल्यानंतर त्याने मुलाच्या गळ्याला पकडून त्या मुलाला जंगलात ओढत नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच वेळी लोकांनी आरडाओरड करून त्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केले असता, बिबट्याने त्या मुलाला तिथेच सोडून जंगलात पळ काढला. आरे कॉलनीत आज झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
नुकताच येथील आरे कॉलनीत बिबट्याने एका वयस्कर आजींवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने या आजी बिबट्याच्या तावडीतून सुखरूप बचावल्या आहेत. या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक आजी काठीचा आधार घेत घराच्या अंगणामध्ये आल्या आहेत. थोड्यावेळाने त्या अंगणातील पायरीवर बसतात. आपल्या पाठीमागे बिबट्या बसला असेल याची भनक देखील त्यांना नसते. या वृद्ध आजींना काही समजण्यापूर्वीच बिबट्या त्यांच्यावर हल्ला करतो.
हेही वाचा - आरे कॉलनीत बिबट्याचा आठ वर्षीय मुलावर हल्ला, सुदैवाने जीवित हानी नाही
हेही वाचा - हल्लेखोर बिबट्या मोकाटच, आरे कॉलनीतून पिल्लाला पकडले