मुंबई - मागील 24 तासांत शहरात कोरोनाचे तब्बल 106 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच लागण झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झालाय. यामुळे मुंबईतील रुग्णांचा आकडा 696 झाला असून मृतांचा आकडा 44 वर पोहचला आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांचे तीन टप्प्यात वर्गीकरण करून उपचार करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलीय.
आज झालेल्या 5 मृतांपैकी 4 जणांना आधीपासून अन्य आजार होते. मुंबईत सध्या 11 हजार लोकांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. झोपडपट्टी सारख्या दाट वस्तीत आढळलेल्या रुग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांचे अति जोखमीचे व कमी जोखमीचे असे वर्गीकरण करण्यात आले आहे. अशा वर्गीकरण केलेल्या 900 पेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अति जोखमीच्या लोकांच्या चाचण्या सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना रुग्णांचे तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात संशयित आणि लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र, लक्षणे असलेल्या व फुप्फुस्साचा आजार असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र, अतिदक्ष उपचाराची गरज असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र असे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणानुसार रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.