मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसात सक्रिय आणि क्रिटिकल रुग्णांचा आकडा दुपट्टीने वाढला आहे. मुंबईत 4 मार्चच्या आकडेवारीनुसार 1,055 क्रिटिकल रुग्ण आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने उपलब्ध असलेल्या खाटांपैकी 149 आयसीयू तर 75 व्हेंटिलेटर रिक्त आहेत.
कोरोनाचा प्रसार वाढला -
मुंबईत मागील वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 27 मार्चला सक्रिय रुग्णांची संख्या 37 हजार 804 इतकी होती. त्यावेळी 29 हजार लक्षणे असलेले तर 7481 लक्षणे असलेले रुग्ण होते. 547 क्रिटिकल रुग्ण होते. 1669 पैकी 481 आयसीयू रिक्त होते. 8534 पैकी 2279 ऑक्सिजन बेड रिक्त होते. 1014 पैकी 243 व्हेंटिलेटर रिक्त होते. त्यात आता वाढ झाली आहे.
1055 रुग्ण क्रिटिकल -
4 मार्च रोजी कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाख 41 हजार 282 वर पोहचला आहे. 3 लाख 66 हजार 365 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 11 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 62 हजार 187 पर्यंत पोहचली आहे. त्यातील 49 हजार 902 रुग्ण म्हणजेच 80 टक्के लक्षणे नसलेले आहेत. 11 हजार 230 म्हणजेच 18 टक्के रुग्णांना लक्षणे आहेत तर 1,055 रुग्ण म्हणजेच 2 टक्के क्रिटिकल आहेत.
75 व्हेंटिलेटर, 149 आयसीयू रिक्त -
मुंबईत जंबो कोविड सेंटर व कोविड सेंटर येथे 21 हजार 366 बेड आहेत. त्यापैकी 15 हजार 769 बेड रुग्णांनी भरलेल्या आहेत. तर 5 हजार 597 बेड रिक्त आहेत. हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयात 16 हजार 247 बेड आहेत. त्यापैकी 12 हजार 378 बेडवर रुग्ण आहेत. तर 3 हजार 869 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 1 हजार 899 खाटा आहेत त्यापैकी 1 हजार 750 बेडवर रुग्ण आहेत तर 149 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 9 हजार 841 बेड आहेत. त्यापैकी 7 हजार 709 खाटांवर रुग्ण आहेत तर 2 हजार 132 खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 168 खाटा आहेत त्यापैकी 1 हजार 93 खाटांवर रुग्ण आहेत तर 75 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत.
तीन हजार बेड वाढवल्या जात आहेत -
रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज आहे. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एखाद्या विशिष्ट अशा रुग्णालयात खाटा हव्यात म्हणून प्रयत्न करू नयेत. पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या सहाय्याने खाटांचे नियोजन केले जात आहे. ज्या ठिकाणी खाटा उपलब्ध होतील त्याठिकाणी उपचार करून घ्यावेत. पालिका आणखी तीन हजार खाटा वाढवत आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.