मुंबई - कोरोना विरोधातील लढ्याला बळकटी देण्यासाठी अखेर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पुढे सरसावले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इतर कोविड रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने बिकेसी, एमएमआरडीए मैदानात चक्क 1000 खाटांचे नॉन क्रिटिकल कोविड रुग्णालय उभारण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात केली आहे.
पुढील 20 दिवसात हे काम पूर्ण होऊन सुसज्ज रुग्णालय सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानावरील 20 हजार चौ. मीटर जागेवर हे रुग्णालय बांधण्यात येत असून याचा खर्च एमएमआरडीए करणार आहे. वैद्यकीय सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने स्वखर्चाने हे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात 1000 खाटा असून यातील 500 खाटावर ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे गरज पडल्यास यात 5000 खाटा वाढवण्याची एमएमआरडीएची तयारी आहे. यातील सुविधा पाहता येथे ऑक्सिजन बरोबरच पॅथॉलॉजी लॅब ही असणार आहे. यात रुग्णांची सर्वसाधारण रक्त तापसणी करता येणार आहे. तर आरोग्य सेवा देणाऱ्या इतर संस्थांच्या धर्तीवर येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचीही सोय येथे असेल. त्याचबरोबर इथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही मोठ्या संख्येने असणार असून त्यांच्याही राहण्याची सोय येथे असेल. मुंबईत अशा प्रकारे उभारले जाणारे हे पहिले रुग्णालय असावे.