मुंबई - परळ येथील टाटा रुग्णालयात येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची निवासाविना होणारी वाताहत आता थांबणार आहे. म्हाडाने रुग्णालयासाठी हाझी कासम चाळीत विनामुल्य १०० फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा निर्णय आहे. या निर्णयामुळे रस्ते, पदपथावर रात्र काढणाऱ्या कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. आव्हाड यांनी आज टाटा रुग्णालय आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे १०० फ्लॅट देण्यात येणार-
राज्यासह देशभरातून वर्षाला ८० हजार रुग्ण येतात. मुंबई आणि महाराष्ट्रातून ३९ टक्के आणि देशातून ६० टक्के रुग्ण दाखल होतात. मागीलवर्षी कोरोना असताना देखील ६२ हजार रुग्ण आले होते. दररोज ३०० रुग्ण येतात. अनेकांना निवासाची सोय नसते. कोरोनाग्रस्तांसह नातेवाईकांना रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. मात्र, आता टाटा रुग्णालयापासून १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे १०० फ्लॅट देण्यात येणार आहेत. राजकारण यामध्ये आडवे येऊ नये, म्हणून सर्व जबाबदारी टाटाकडे दिली जाणार आहे, असे आव्हाड म्हणाले.
म्हाडाकडून मिळालेल्या जागेमुळे रुग्णांना दिलासा मिळेल-
रोज ३०० रुग्णांची सोय करावी, अशी रुग्णांची मागणी असते. जागेअभावी इच्छा असतानाही व्यवस्था करता येत नाही. म्हाडाकडून मिळालेल्या जागेमुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असे टाटा रुग्णालयाने स्पष्ट केले. तसेच जेवढी मदत मिळेल, तेवढी कमी असल्याचे मत मांडले. दरम्यान, भविष्यात दोनशे फ्लॅट टाटा रुग्णालयाला देण्यात येतील, असे आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा- श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला; एक जवान हुतात्मा