मुंबई - जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. त्याचवेळी भारतातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याप्रमाणे रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या ९,७७९ प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात १० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई, राज्यासह देशभरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. धार्मिक सण आणि दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. आजपासून ही चाचणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आदी रेल्वे स्थानकावर सुरु करण्यात आली आहे.
या रेल्वे स्थानकावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर १,०७९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली, त्याठिकाणी कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नाहीत. मुंबई सेंट्रल येथे ३४०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली त्याठिकाणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले नाही. दादर येथे २,००० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी एक प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ३१५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी ३ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वांद्रे स्थानकात २,०४७ प्रवाशांची तपासणी केली असता ५ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर बोरिवली येथे ९३८ प्रवाशांची तपासणी केली असता १ प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईमधील सहा रेल्वे स्थानकावर केलेल्या तपासणी दरम्यान ९,७७९ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लस ठेवण्यासाठी जागेचा शोध -
कोविडवरील लसीची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची जागा शोधण्याचे काम मुंबई महापालिकेकडून सुरु आहे. मुंबईत शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात 3 जागांचा विचार सुरु आहे. त्यापैकी पूर्व उपनगरातील कांजुर-भांडूप जवळील एक जागा जवळ-जवळ निश्चित मानण्यात येतेय. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे असे काकाणी यांनी सांगितले.
रिव्हर्स मायग्रेशनवर लक्ष -
अनलॉक आणि दिवाळीनंतर मुंबईत मोठ्या संख्येने रिव्हर्स मायग्रेशन सुरु झालंय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यादरम्यान मुंबईतील २२ हजार घरे बंद असल्याचे समोर आले होते. या २२ हजार घरांवर आता प्रशासनाचे लक्ष आहे. यापैकी २ हजार लोक घरी परतले आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत या सर्वांचे स्क्रिनिंग केलं जाईल, असे काकाणी म्हणाले. आवाजावरुन करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल १० डिसेंबरपर्यंत येईल असेही काकाणी म्हणाले.