मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीमुळे दोन ते अडीच महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रिन्सच्या कुटूंबीयांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थायी समिती, सभागृह तसेच गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आज प्रिन्सच्या कुटूंबीयांना केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्या हस्ते १० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार तामील सेलवन उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतात म्हणून देशभरातून रुग्ण पालिका रुग्णालयात येत असतात. उत्तर प्रदेशमधील मवू येथील प्रिन्स या दोन ते अडीच महिन्याच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने त्यावर उपचारासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स २० ते २२ टक्के भाजला. त्याचा हात, कान, आणि छातीचा भाग भाजला. गॅंगरिंग झाल्याने त्याचा हात कापण्यात आला. याचे पडसाद स्थायी समिती, सभागृहात उमटले. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रिन्सच्या उपचाराचा सर्व खर्च पालिकेने उचलावा, नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये द्यावेत अशी मागणी करण्यात आली. पालिकेने प्रिन्सच्या कुटुंबीयांना ५ लाख देण्याची तयारी दाखवली. हे ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबीयांनी घेण्यास नकार दिला. त्यानंतर मागील बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रिन्सच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रिन्सच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप आमदार तामिल सेलवन यांनी पालिका आयुक्तांची तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी केईएमचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर आज प्रिन्सच्या कुटूंबीयांना ५ लाखांचे दोन चेक असे १० लाख रुपये देण्यात आले.