मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत गेल्या १५ दिवसांत रस्त्यावर थुंकणाऱ्या ८५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १ लाख ४६ हजारांचा दंड पालिकेने वसूल केला आहे. तर विना मास्क फिरणाऱ्यांकडून गेल्या ५ महिन्यात १८,११८ जणांवर कारवाई करत ६० लाख ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली असून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या केवळ १५ दिवसांत रस्त्यावर थुंकणाऱ्या ८५२ जणांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १ लाख ४६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विना मास्क घराबाहेर पडणाऱ्यांवरही पालिकेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पाच महिन्यात म्हणजे २० एप्रिल ते १ ऑक्टोबरपर्यंत १८,११८ जणांवर कारवाई करत ६० लाख ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. १३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १३१२७ जणांवर कारवाई करण्यात आली असून २६ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार शिंकणे, खोकणे यातून होण्याचा धोका सर्वाधिक असल्याने पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेक बेजबाबदार नागरिक बिनधास्तपणे मास्क न लावता फिरत आहेत. शिवाय रस्त्यावर थुंकण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे कोरोना फैलावण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मास्क न घालता फिरणारे आणि रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या पालिका अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत असून लवकरच या कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.