कोल्हापूर - पिस्तूल साफ करत असताना गोळी सुटून कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरीमधल्या चांदी व्यापाऱ्याचा मुलगा ठार झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी ही गंभीर घटना घडली आहे. सागर सुनील गाट असे या युवकाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. घडलेल्या या घटनेनंतर हुपरीसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
हुपरीमधील मोठ्या चांदी व्यापाऱ्यांचा होता मुलगा -
कोल्हापुरातल्या हुपरी मधील सुनील विद्याधर गाट हे गेल्या अनेक वर्षांपासून चांदीचा व्यापार करत आहेत. हुपरीमधील प्रसिद्ध आणि मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांचे नाव येते. आपल्या दोन मुलांसह ते हुपरीमधील शांतीनगर वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा सागर हा आज दुपारी वडिलांची पिस्तूल साफ करत होता. मात्र, अचानकच त्यामधून गोळी सुटून सागर गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली होती पिस्तूल -
सुनील विद्याधर गाट हे गेल्या अनेक वर्षांपासून या चांदी व्यवसायात आहेत. व्यापरानिमित्त त्यांना नेहमीच बाहेर जावे लागत असते. त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी रिव्हॉल्व्हर घेतली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेल्या पिस्तूलनेच त्यांच्या मुलाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के आदी दाखल झाले. पुढील चौकशी सुरू आहे.