कोल्हापूर - गेल्या 20 वर्षांपासून सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या कोल्हापुरातील मोनिका शिवाजी मोहिते यांनी जाहीर झालेल्या शेतीविषयक अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. आजच्या अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक फायदे आहेत, असे मत सुद्धा मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
- '...तर शेती क्षेत्रात चांगला बदल होईल'
सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहेत. मात्र आपण याला पर्याय म्हणून स्वतः सेंद्रिय शेती करण्याचे ठरवले. या शेतीबाबत कोणताही अभ्यास नव्हता. मात्र विविध पुस्तके वाचून, सेमिनार तसेच कोर्स करून खूप चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करत आहे. सर्वच शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेती केली पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे शेताची सुपीकता वाढते, अशी प्रतिक्रियाही मोहिते यांनी दिली. शिवाय आज जाहीर झालेल्या बजेटमध्ये झिरो फार्मिंग, सेंद्रिय शेतीबाबत कृषी महाविद्यालय तसेच विद्यापीठ यांच्यावर अधिक जबाबदारी देणार असल्याचे म्हटले. याचा खूपच चांगला फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंद्रिय शेतीची माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. शिवाय शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळतील, असे मत मोनिका मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
- सेंद्रिय शेतीचे फायदे
1) शेतीची सुपीकता वाढते, जमिनीची धूप कमी होऊन दर्जा सुधारतो.
2) जमिनीमध्ये पाणी साठविण्याची क्षमता वाढते, परिणामी पाण्याची सुद्धा बचत होते.
3) खर्चात मोठी बचत होते आणि शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळू शकतो.
4) पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
5) प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
6) शेतीमालाचा दर्जा उंचावतो.
7) रासायनिक खतांच्या वापराने विविध रोग, आजार उद्भवतात ते थांबणार. यासह अनेक फायदे सांगता येतील असे मोहिते यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Nitesh Rane Case Hearing : नितेश राणे यांना धक्का; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, उच्च न्यायालयात धाव