कोल्हापूर - सध्या पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २५ हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. दिवसाला हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या व्यवस्थेचा फटका कोल्हापुरातील चव्हाण कुटुंबीयांना बसला आहे. कारण घरचे दोन शिलेदार कोरोनाने त्यांच्यापासून हिरावून घेतले आहेत. घरचे दोन आधारस्तंभ गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणेची काय अवस्था आहे, पाहुयात 'ई टीव्ही भारत'च्या या रिपोर्टमधून...
हेही वाचा - '...तर भविष्यात मराठ्यांची ताकद राज्य सरकारला धुळीस मिळवेल', मराठा समाज आक्रमक
कोल्हापुरातील कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणादेखील हतबल झाली आहे. प्रशासन देखील नियोजनात कमी पडत आहे. याचा अनुभव रुग्णांसह नातेवाइकांना येत आहे. परिस्थिती गंभीर नसताना सुरुवातीच्या काळातच कोल्हापुरातील चव्हाण कुटुंबीयांना याचा वाईट अनुभव आला. रुग्णालय न मिळाल्याने दोन सख्ख्या भावांना चव्हाण कुटुंबीयांनी गमावले आहे. आधी कृष्णा आणि सहा दिवसांच्या फरकाने चंद्रकांत यांचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोरोना झाल्यानंतर या दोन्ही भावांना शहरात रुग्णालय मिळाले नाही. शहरातल्या अनेक रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवून सीपीआरला आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण, रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही. अखेर रुग्णवाहिका मिळाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर चंद्रकांत यांना सीपीआर या सरकारी रुग्णालयात आणले खरे, पण काहीच उपयोग झाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे कृष्णा व चंद्रकांत यांचे नातेवाईक गणेश चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - व्यथा सांगण्यासाठी शेतकरी पुत्राने मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ
चव्हाण कुटुंबात एकूण पाच भाऊ आहेत. त्यापैकी सर्वात मोठा कृष्णा आणि त्यांनतर चंद्रकांत होते. यांच्या मार्गदर्शनाखालीच कुटुंबाची वाटचाल सुरू होती. मात्र, आधारस्तंभच नाहीसे झाल्याने मोठे संकट कोसळले असल्याचे चव्हाण कुटुंबीयांनी सांगितले.
आजही ऑक्सिजन, रुग्णालय, रुग्णवाहिका मिळवण्यासाठी नागरिकांना धडपड करावी लागत आहे. वेळेत मिळाला तर ठीक, नाहीतर मृत्यू अटळ आहे. पश्चिम महाराष्ट्रात वाढलेला कोरोना रोखायचा असेल तर मुंबईत ज्या पद्धतीने सरकारने काम केले, तशी यंत्रणा ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.