कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्या विषाणून झपाट्याने पाय पसरवायला सुरुवात केली. अनेकांचे बळी देखील या विषाणूने घेतले आहेत. मात्र, या महामारीच्या लढाईत आरोग्य सेवक मोठ्या धैर्याने त्याचा सामना करत आहेत. त्याच प्रमाणे कोल्हापुरातील एक दाम्पत्य पोटच्या दोन लहान जिवांना घरी ठेवून गेल्या दीड वर्षापासून सीपीआर रुग्णालयातील कोरोनाबाधितांची सेवा करत आहे. रुग्ण सेवा हीच ईश सेवा मानून आरोग्य सेवा करणाऱ्या सुर्यवंशी दाम्पत्याच्या कार्याचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट..
आई-वडील आणि बहीण या नात्याचे प्रेम दिले ईश्वरीने
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दोघेही कामावर हजर राहायचे. त्यावेळी तन्मय व तनिष्क एक वर्षाचे होते. त्यांना घरीच ठेवून हे दोघे सेवा बजावत होते. या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची मोठी मुलगी ईश्वरी आली. ज्या वयात या दोन मुलांना आई-वडिलांचा आधार हवा होता. त्यावेळी कोरोनामुळे तो मिळाला नाही. मात्र आई-बहीण आणि वडील या तिन्ही नात्याची सांगड घालत ईश्वरीने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
लहान वयात सांभाळणे कठीण, पण माझेच भाऊ आहेत-
दोन्ही भावंडे लहान आहेत. त्यातच आई-वडील कामाला गेल्यानंतर या दोघांचे सर्वकाही मला बघायला लागायचे. त्यातून शाळेचा ऑनलाईन अभ्यासही सुरुच होता. माझे दोघे भाऊ लहान असल्याने ते खूपच मस्ती करायचे. मात्र, मी त्यांचे खाणे पिणे करून झोपवत असे. त्यानंतर ते उठले की त्यांना अंघोळ घालून आम्ही खेळत बसायचो. त्यांना सांभाळणे कठीण जायचे, मात्र ते माझेच लहान भाऊ आहेत, अशी प्रतिक्रिया ईश्वरीने दिली.
मोह आवरत नाही पण-
लहान असताना मुलांना आई-वडिलांची खूप जास्त गरज असते. पण कोरोनामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही. आता लीना कामावर असेल तर किरण हे घरी राहतात. किरण कामावर असेल तर लीना घरी राहतात. असे चक्र सुरू आहे. पण कोरोनाची परिस्थिती गंभीर होती. त्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये थांबत होतो. त्यावेळी मुलांना पाहण्याचा मोह आवरत नसे, कधी घरी जाऊन मुलांना मिठीत घेतो, अशी या दोघांची परिस्थिती होती. मात्र घरी जाऊन देखील स्वत: पूर्ण सॅनिटाईज झाल्याशिवाय आणि अंघोळ केल्याशिवाय मुलांना जवळ घेत नसो. तोपर्यंत मुले झोपी गेली असायची अशी प्रतिक्रिया या दोघा आरोग्य सेवक दाम्पत्यांनी दिली.
व्हाट्सअॅपचा आधार, रुग्णालयाचेही सहकार्य-
काहीवेळेस ही दोघेही मुले आई-बाबा म्हणून रडत बसायचे. त्यावेळी सर्वात मोठा आधार व्हाट्सअॅपचा होता. त्यांना व्हिडिओ कॉल करून आम्ही बोलयचो त्यावेळी ती गप्प बसत असे. त्यानंतर मुले शांत झोपून जायची. याकाळात तसेच ऑफिस स्टाफने देखील मोठे सहकार्य केले असल्याचे सांगितले.