कोल्हापूर - राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना निवडणुकीत विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घेतला आहे. 'आमचं ठरलंय' हे वाक्य गेल्या महिन्याभरापासून सतेज पाटील यांच्या गटातून जिल्ह्यात चर्चेत आले आहे. याचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'तू ठरवलसं तर मी बी ध्यानात ठेवलयं' असे म्हणत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता टोला लगावला. ते पेठवडगाव येथील राजू शेट्टींच्या प्रचार सभेत बोलत होते.
संकुचित गोष्टीला जाऊ नका, असाही इशारा शरद पवारांनी सतेज पाटील यांना दिला आहे. पुढे ते म्हणाले, की छोट्या गोष्टीसाठी देशहिताकडे दुर्लक्ष करू नये. कोल्हापूरचा स्वाभिमान असेल तर चुकीचा रस्ता बंद करा. बळीराजासाठी पडेल ती करण्याची तयारी केली तर तुम्हाला सन्मान मिळेल. नाहीत आला तर जनता तुमच्याकडून किंमत वसूल करेल, असा सूचक इशारा त्यांनी नाव घेता सतेज पाटील यांना दिला.
यामुळे सतेज पाटील यांच 'ठरलय'
धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप वारंवार सतेज पाटील यांनी केला. यावेळी प्रत्युत्तर म्हणून मदत करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
'आमचं ठरलंय' वाक्यावर आली रिंगटोन
'आमचं ठरलंय' हे वाक्य गेल्या महिन्याभरापासून अनेकांच्या तोंडामध्ये ऐकायला मिळत होतं. आता तर या वाक्यावर रिंगटोनच बनलेली आहे. याच गाण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे. एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या एका नेत्याला हिनवण्यासाठी ही रिंगटोन तयार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.