कोल्हापुर - कारंडे माळ येथील माळावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या कळपातील सात शेळ्या चोरट्यांनी पळवल्याची घटना कोल्हापूरात घडली. एरव्ही शेळी चोरण्याची घटना विशेष महत्वाची ठरली नसती. मात्र, कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मटण दरवाढविरोधी तीव्र भावनांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने याची विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, एकाच रात्री सात शेळ्या अचानक गायब झाल्याने शेळी मालकाने थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठून याबाबत गुन्हा नोंद केला.
हेही वाचा - कोल्हापुरात मटणाचे दर कडाडले, खवय्ये नाराज
शेळी मालक बाळू शिंदे हे रविवारी दुपारी त्यांच्या 13 शेळ्या कोल्हापुरातील कारंडे माळ येथील माळावर चारण्यासाठी घेऊन गेले होते. शिंदे काही काळ झाडाजवळ विसावा घेत होते. ती संधी साधून चोरट्यांनी कळपातील 7 शेळ्या पळवून नेल्या. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाल्यानंतर काही तासांतच कनाननगर मधील संशयित शेळी चोर शिवाजी पांडुरंग कुंभार याला ताब्यात घेतले. संशयित कुंभारकडून 5 शेळ्या हस्तगत करण्यात आल्या असून ज्या गाडीतून या शेळ्या चोरून नेल्या ती गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. संशयितांनी कमी किमतीत वडगाव, इचलकरंजीसह परिसरात बाकीच्या शेळ्यांची विक्री केली असल्याचे उघड झाले. यापूर्वी अशा प्रकारची घटना कधी घडली नव्हती पण कोल्हापुरातील मटण दरवाढीचा मुद्दा कळीचा बनलेला असतानाच शेळ्या चोरीचा प्रकार घडल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एक-दोन शेळ्या गायब झाल्याचे सुद्धा आता समोर येऊ लागले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात मटण दरवाढ आंदोलन तापणार; आंदोलक, विक्रेते आपल्या भूमिकेवर ठाम