कोल्हापूर - संपूर्ण देशभरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे आहेत. मात्र कोल्हापुरातील बिंदू चौक येथे असलेला त्यांचा अर्धाकृती पुतळा मात्र यामध्ये विशेष आहे. त्याला कारणही तेवढंच खास आहे, कारण हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच उभारण्यात आला असून स्वतः आंबेडकर यांनी याठिकाणी भेट दिली होती. त्यामुळेच याला ऐतिहासिक महत्व आहे. काय आहे यामागचा संपूर्ण इतिहास ? आणि कोणामुळे हे शक्य झालं ? याबाबत माहिती सांगणारा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट..
भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य आणि विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही भावना ठेवून थोर समाजसुधारक माधवराव बागल यांनी कोल्हापुरात दोघांचेही पुतळे उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा प्रतिमा समिती सुद्धा बनविण्यात आली. या समितीचे माधवराव बागल अध्यक्ष होते. 9 डिसेंबर 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे ब्रॉन्झमधील दोन पुतळे उभारण्यात आले. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे हे पुतळे उभारण्यात आले. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्येच त्यांनी हा पुतळा उभारला होता. त्यामुळे बाबासाहेबांचा हा जगातील पहिलाच पुतळा ठरला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर एकदा कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी याठिकाणी भेट देऊन पुतळा पाहिला होता, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार श्री. बाळ चव्हाण यांच्याकडून बनवून घेतला होता.
कोल्हापूर आणि बाबासाहेबांचे वेगळं नाते -
कोल्हापूर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जे आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे होते. त्यांचे आणि कोल्हापूरचे असणारे वेगळे नाते राजर्षी शाहू महाराजांपासून तयार झाले होते, हे सर्वांनाच माहिती आहे. शाहू महाराजांनी आंबेडकर यांना मदतही केली होती. हेच ऋणानुबंध पुढे जाऊन राजाराम महाराजांनीही कायम ठेवल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. त्यांनतर बाबासाहेबांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे, त्यांचे विचार समजावेत याच भावनेतून समाजसुधारक भाई माधवराव बागल यांनी आंबेडकर यांचा पुतळा कोल्हापुरात बसविण्याचे ठरवले. त्यानुसार 1950 मध्ये कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आल्याचेही सावंत यांनी म्हटले. भारतासह जगात अनेक ठिकाणी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यापुढे लाखो पुतळे उभारले जातील. मात्र खऱ्या अर्थाने कोल्हापुरातील या पुतळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आंबेडकर यांनी स्वतः कोल्हापुरात भेट देऊन पाहिलेला हा पुतळा असून जगातला सर्वात पहिला पुतळा असल्याचा अभिमान सुद्धा असल्याचे सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.