कोल्हापूर - कोरोनाच्या लढ्यात सर्वच घटक अहोरात्र काम करत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी सुद्धा आरोग्य सेवा बजावत आहेत. मात्र, या कंत्राटी आरोग्य सेवकांवर आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरच्या आरोग्य सेविका आणि सेवकांनी रक्तदान आंदोलन केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी आणि आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने कोल्हापुरात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. आगामी काळात होणाऱ्या ‘मेगा भरती’मध्ये नियमित शासन सेवेमध्ये अनुभवाच्या आणि शिक्षण शास्त्राच्या आधारे बिनशर्त समायोजन करावे, या मागणीसाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जवळपास 50 पेक्षा अधिक आरोग्य विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रक्तदात्यांनी मागण्यांचे फलक हातात घेत आंदोलन लक्षवेधी केले.