कोल्हापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली आहे. फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नाही तर, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भिडणारा स्वाभिमानी पक्ष असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केली आहे. कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
- कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळावा यासाठी खेड्यातील माल थेट शहरातील नागरिकांना पोहोचवण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार.
- शहरात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न तसेच अनेक पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. ते सर्व प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सोयी मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार.
- मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नेत्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष नाही. नागरिकांना देखील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
स्वाभिमानीची पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत उडी
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत निवडणूक लढवत आली आहे. मात्र यापूर्वी कधीही पक्षाने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये रस दाखवला नाही. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी यापुढे शेतकाऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे सुद्धा आता लक्ष देणार असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना फक्त राजकारणात इंटरेस्ट
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांना फक्त राजकारणात रस आहे. मात्र त्यांना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात रस नाहीये. त्यामुळे ज्याप्रमाणे ऊस आणि दूध आंदोलनानंतर शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे, त्याप्रमाणेच आता शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे शहरप्रमुख अजित पवार यांनी म्हटले.
कोरोनामुळे महापालिका निवडणूक आणखी 3 महिने पुढे जाण्याची शक्यता
महापालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र कोरोनामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. मार्च महिन्यापर्यंत निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. मात्र सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून यामध्ये आता स्वाभिमानी पक्षाने सुद्धा उडी घेतली आहे. सद्या पालिकेमध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली असून आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष ठेऊन आहेत.