कोल्हापूर - घरगुती वीज बिलातील झालेली दरवाढ त्वरीत रद्द करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयसिंगपूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शंखनाद देखील करण्यात आला. येथील उप कार्यकारी अभियंत्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहेत. एप्रिल महिन्यापासून 5 ते 15 टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. एकूण तीन महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ठ झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी सुरू असून रोजगार देखील बुडालेला आहे. व्यापारपेठेतील मंदीमुळे कामगार वर्गांच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे बंद पडलेली आहेत. यातच घरगुती वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती वीज बिलांमध्ये झालेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. तीन महिन्याच्या सरासरीत बिलात झालेली वाढ कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा. कोणत्याही परिस्थितीत थकीत वीज बिलांची वसुली करू नये. जबरदस्तीने वसुली केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.