कोल्हापूर - कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसान भरपाईपासून पोल्ट्री धारक आणि शेतकऱ्यांना खड्या प्रमाणे बाजूला केले आहे. 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली, मात्र ज्यांना शेती कळते त्यांनी मदत देण्यास टाळाटाळ केली. असा टोला माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला. दरम्यान, या विविध मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पुढील निर्णय जाहीर करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला अनेक कारणे आहेत. तापमान वाढ, नद्यांची पाणी धारण करण्याची क्षमता, नद्यांवर बांधलेले पूल, रस्त्यावर टाकलेले भराव अशी बरीच कारणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला येणाऱ्या महापुराची आहेत. राज्य सरकारने दरवर्षी मदत जाहीर करण्यापेक्षा त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी शेट्टी यांनी व्यक्त केली.
- 2019 च्या शासन निर्णयानुसार पीक कर्ज माफ करावे.
- 103 पुलावर कमानी पूल बांधावे.
- पूर पट्ट्यातील घरांचे संपूर्ण पुनर्वसन करावे.
- भूस्खलन झालेल्या ठिकाणी नुकसान भरपाई आणि पुनर्वसन करावे.
- पूरग्रस्त विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी.
- पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रयत्न करावे.
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.
- शेडनेट, ठिबक सिंचन, विद्युत मोटार याचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.