कोल्हापूर - शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापुरातील बिंदू चौक येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी शेट्टी यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
हेही वाचा - राजू शेट्टींकडून कृषी कायद्यांची होळी; म्हणाले, शेतकरी एकटा नाहीये हे बंदमधून समजलं
विनाकारण प्रतिष्ठा पणाला लावू नये
कोणीही प्रतिष्ठा पणाला लावली तरी शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठा नाही. हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांच्या मुळेच हा देश चालला आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही, असेही शेट्टींनी यावेळी म्हटले.
उद्याच्या बैठकीत केंद्राने कायदे मागे घेतल्याचा निर्णय जाहीर करावा अन्यथा...
केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावे. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये हे लादलेले कायदे मागे घेतले नाहीत तर, देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. शिवाय, केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. मात्र, हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर, आजच्या भारत बंदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय