कोल्हापूर - अंबाबाई देवीच्या स्नानाचे पाणी ज्या कुंडामध्ये जाते, त्या मणकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम गेल्या नऊ महिन्यापासून सुरू आहे. या उत्खनात काही वस्तू, शिल्प सापडले आहेत. त्या सर्व वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा करा, असे पत्र पुरातत्व विभागाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा कुंड बुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे उपलब्ध काही मोजक्या माहितीच्या आधारेच कुंडाच्या खोदाईचे काम सुरू झाले. हे सगळं काम करत असताना कोणत्याही पद्धतीने यंत्राचा वापर न करता केवळ मनुष्यबळाच्या आधारेच याचे खोदकाम करण्यात येत आहे. जवळपास आठ महिन्यांपासून हे काम सुरू आहे. आता काम जवळपास पूर्णच होत आले असल्याने या कुंडाचा आकार स्पष्टपणे दिसू लागला आहे. शिवाय मणकर्णिका कुंडाची भव्यतासुद्धा समोर आली आहे.
या खोदकामा दरम्यान मोठ्या प्रमाणात पुरावशेष प्राप्त झाल्याचे समजले आहे. भारतीय निखात निधी अधिनियम 1878 व मुंबई निखाते निधी अधिनियम 1949 अन्वये आपणास कळविण्यात येते की मणिकर्णीका कुंड खोदकामात जे पुराणवशेष प्राप्त झाले आहेत, ते सर्व पुरातत्व या विभागाकडे संशोधनात्मक अभ्यासासाठी जमा करावेत. त्यामुळे सर्व पुरावे विभागाच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कारवाई आपल्या स्तरावर व्हावी. यासह पुरातन अवशेष टाऊन हॉल म्युझियम कोल्हापूर या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात येतील, असे या पत्रात म्हटले आहे.