कोल्हापूर - येत्या रविवार म्हणजेच 14 मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा होणार होती. केवळ 3 दिवस पुढे असतानाच अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून आता याचा निषेध व्यक्त केला जात आहे. शिवाय अनेक विद्यार्थी उद्विग्न अशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत, त्याला आमचा विरोध असून लवकरच याचा फेरविचार करून पुन्हा तत्काळ तारीख जाहीर करावी, असे अनेक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
'सोशल डिस्टन्स पाळूनच परीक्षा होणार होती'
14 मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा ही सोशल डिस्टन्सचे नियम पाळूनच होणार होती. शिवाय आम्ही सर्व सुशिक्षित नागरिक होतो. सर्वांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले असते. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी काहीही अडचण नव्हती. मात्र शासनाने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असून याबाबत तत्काळ विचार करून तारीख पुन्हा जाहीर करावी, असेही या विद्यार्थिनीने म्हटले आहे.
हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
'अधिवेशन पार पडते मग परीक्षा का नाही?'
एकीकडे अनेक नेत्यांच्या सभा कार्यक्रम पार पाडतात. नुकतेच अधिवेशनसुद्धा झाले. हे सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून होत असेल तर आमच्या परीक्षा का पुढे ढकलल्या, असा सवाल केला जात आहे.