कोल्हापूर - राज्यातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात ७५%, मे महिन्यात ५० % वेतन मिळाले आहे. तसेच या कामगारांना जून-जुलै महिन्यातील वेतनच मिळालेले नाही. त्यांचा वेतनाचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. वेतनाचा प्रश्न जलद गतीने सोडवावा,अन्यथा कर्मचाऱ्यांसह कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन याचा उद्रेक होईल, असा इशारा देखील संघटनेने दिला आहे.
कोल्हापूर विभागातील महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली.
संबंधित चर्चेदरम्यान कृती समितीतील सदस्यांनी महामंडळाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तातडीने राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच तातडीने थकीत वेतन मिळावे, महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे अशी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या प्रकरणावर सतेज पाटील यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लवकरच कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळेल, असे ते म्हणाले. तसेच एस टी.चे शासनात विलीनीकरण करण्यासाठी संघटनेच्या मताशी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कायदेशीर मत घेऊन शासनस्तरावर बाजू मांडली जाईल आणि सामोपचाराने यातून मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संयुक्त कृती समितीचे संजीव चिकुर्डेकर, उत्तम पाटील, आप्पा साळोखे, दादू गोसावी, तकदीर इचलकरंजीकर यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.