कोल्हापूर - कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सरकारने जत्रा, यात्रा रद्द करून कुस्तीचे मैदान, आखाडा बंद ठेवले आहेत. याचा मोठा फटका कुस्तीचा सराव करणाऱ्या पैलवानावर झालाय. लॉकडाऊन नंतर देखील या पैलवानांना आपली शरीरयष्टी बळकट ठेवण्यासाठी कसून सराव करावा लागतोय. पण हे करत असताना पैलवानांना लागणारा खुराक न परवडणारा आहे. त्यामुळे नेमकं काय करायचे असा प्रश्न पैलवानांना सतावत आहे. हेच पैलवान आत्ता कुस्तीचे आखाडे सुरू करा, अशी मागणी करत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आले. अनेक पैलवानांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते कुस्तीचा सराव करत आहेत. अशा काळात गेली सहा महिन्याहून अधिक काळ तालमी बंद असल्याने त्याचा परिणाम पैलवानावर होत असल्याने तालीम सुरू करण्याची मागणी केल्याचे यावेळी पैलवान मधुकर चव्हाण यांनी सांगितले.