कोल्हापूर - कोरोनामुळे गेली 2 वर्ष साजरी न करता आलेली होळी यंदा मात्र थाटात साजरी करण्याचा कोल्हापूरकरांनी ठरवले आहे. मात्र याच वेळी सामाजिक बांधिलकी जपले जावे यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आवाहन केले गेले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी 'होळी लहान, शेणी दान' करायला सुरुवात केली आहेत. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमी येथे रोज अनेक मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असतात. यावेळी लाकडाचा वापर न करता फक्त शेणीचा वापर करण्याची संस्कृती कोल्हापुरात अनेक वर्षांपासून जपली जात आहे. म्हणून यावर्षीच्या होळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या या शेणी दानाच्या आवाहनाला कोल्हापूरकर प्रतिसाद देताना दिसत आहे.
'होळी लहान करा, शेणी दान करा' उपक्रम
गेल्यावर्षी कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे पंचगंगा स्मशानभूमीच्या गोडवूनमध्ये ठेवण्यात आलेल्या शेण्या पुराच्या पाण्यात भिजल्या. तसेच कोरोना काळामध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढल्याने शेणीचे प्रमाण कमी झाले. याच कारणामुळे सध्या पंचगंगा स्मशानभूमीच्या गोडाऊनमध्ये शेणीची संख्या कमी आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शेणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि याच आवाहनाला आता कोल्हापूरकरानी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
'समाजाप्रती देणे लागते हीच भावना'
होळीसाठी सर्व जण एकत्र येत शेणी गोळा करून ती रचून त्याची पूजा करत पेटवली जाते. मात्र यावर्षी होळीमध्ये शेणीचा वापर कमी करून या सर्व शेणी पंचगंगा स्मशानभूमीत दान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमात शहरातील अनेक नागरिक, सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. समाजाप्रती देखील आपले काही देण लागते आणि हीच भावना मनात घेऊन आम्ही शेणी दान करत आहोत, अशी भावनाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Ashes Holi Bihar : बिहारच्या 'या' गावातून झाली होळीची सुरुवात; राखेने खेळतात होळी