कोल्हापूर - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे मुल्यांकन करून आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार संपतबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये बैलगाडीसह शेतकरी सहभागी झाले होते.
कोल्हापुरात ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषी पाईपलाईनची नुकसान भरपाई करून मिळावी, कृषिपंपाची सरकारी पाणीपट्टी माफ करावी, मृत झालेल्या जनावरांचे मुल्यांकन करून नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण शेतकऱ्याची सरसकट 100 टक्के कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्या आज शेतकरी कामगार मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले. यावेळी माजी आमदार संपत बापूपाटील म्हणाले, राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. असे असताना केवळ सत्तेसाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी सर्व पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील उद्योग व्यवसायामध्ये मंदीची लाट आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सर्वांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.