कोल्हापूर - 17 एप्रिलला कर्नाटकातील बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडत आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात शुभम शेळके या तरुणाला एकीकरण समितीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे बेळगावात सभा घेणार आहेत. राऊत यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.
बुधवारी संजय राऊत यांची सभा -
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून आता संजय राऊत शेळके यांच्या प्रचारासाठी बुधवारी बेळगावमध्ये येणार आहेत. बेळगावमधील रेल्वे फ्लायओव्हर नजिकच असलेल्या मराठा मंदिर येथे ही सभा घेण्यात येणार आहे. यावेळी भव्य रोड शोचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
शुभम शेळकेंसाठी शिवसेनेची माघार
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने यानंतर आपल्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेतला असून शेळके यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
चुरशीची लढत
बेळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 6 ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वी याठिकाणी महाराष्ट्रात एकीकरण समितीचेच जास्त आमदार पाहायला मिळायचे. मात्र, अलिकडे समितीचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. सीमाभागातील स्थिती पाहता मराठी मते निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. एकूणच ही तिरंगी लढत आता अधिक चुरशीची झाली आहे.
अशी असेल लढत -
सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगावमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. सलग चारवेळा याठिकाणी भाजपचीच मक्तेदारी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अंगडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मंगल अंगडी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके या तरुणाला उमेदवारी मिळाली आहे.