कोल्हापूर - चार दिवसांपूर्वी "राजं.. मला वाचवा ! पन्हाळा ( Panhala ) बुरुज आणि ऐतिहासिक वास्तूंची दुरावस्था" या आशयाखाली 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अनेक दुर्गप्रेमी संस्था तसेच तरुणांकडून पन्हाळा येथे जनजागृती केली जात आहे. त्यानंतर आता स्वतः संभाजीराजे ( Sambhaji Raje ) छत्रपती यांनी दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) तसेच पुरातत्व विभागाला ( Department of Archeology ) पत्र लिहून लवकरात लवकर पन्हाळा गडाच्या संवर्धनाची मागणी केली आहे.
तातडीने उपाययोजना करा - संभाजीराजे ( Sambhaji Raje ) यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या अशा तीन राजधानीच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागतोय, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ ही इथे दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे असे चित्र दिसते असेही संभाजीराजे ( Sambhaji Raje ) यांनी म्हटले.
राज्य शासनाची जबाबदारी - पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी ठरते. वेळीच किल्ल्याची डागडुजी व संवर्धन केले नाही तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व नगरपालिके बाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा संभाजीराजे ( Sambhaji Raje ) यांनी केली.
दुर्ग संवर्धकांची भावना - महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांपैकी एक महत्वाचा गड असलेल्या पन्हाळ्याकडे ( Panhala fort Kolhapur ) आता प्रशासनासह पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच चार दरवाजा जवळील नेबापुर व मंगळवार पेठकडे जाण्याच्या पायवाट मार्गावरील ऐतिहासिक तटबंदीचा काही भाग कोसळला. तर तटबंदीला जागोजागी भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे 'पन्हाळा गड वाचवा' असेच म्हणण्याची वेळ आता आल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून डागडूजी करून पन्हाळा गडाचे संवर्धन करण्याची गरज असल्याची भावना दुर्ग संवर्धक आणि नागरिकांनी केली आहे.
'...तर गडावरील महत्वाच्या वास्तू नामशेष होतील' : दरम्यान, पन्हाळा किल्ल्याला महाराष्ट्रात आणि मराठा साम्राज्याच्या एक गौरवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच पन्हाळा गडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे अनेकदा मोठ्याप्रमाणात गडावरील वास्तूंची, बुरुजांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता सुद्धा दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने नाक्याजवळील चारदरवजाच्या जवळील तटबंदीच्या भिंतीचा काही भाग काल कोसळला. उर्वरीत अवशेषापैकी पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर, मंगळवार पेठ गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलाहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली ही भिंत आहे. या जवळच गत वर्षी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात भिंतीना तडे गेले आहेत. पुरातत्व विभागाने या ठिकाणाची पहाणी पण केली होती, पण निधी अभावी दुरुस्ती होवू शकली नसल्याचे सांगण्यात येते.
सज्जा कोटी वास्तूला सुद्धा धोका : पन्हाळा गडावर सज्जा कोटी वास्तूला सुद्धा आता मोठया प्रमाणात भेगा पडल्या आहेत. बांधकाम मजबूत असल्याचे दिसत असले तरी त्यावर झाडवेली वाढल्याने जागोजागी भेगा पडू लागल्याने धोका निर्माण होत आहे. काही वर्षापासून तर या वास्तूच्या दोन्ही बाजू ढासळल्या आहेत. त्याची आजपर्यंत कोणत्याही प्रकारे डागडुजी केली नाहीये. त्यामुळे पन्हाळगड सुशोभीकरणासाठी शासन कोटीचा निधी उपलब्ध करून गडावर सुशोभीकरण केल्याचे भासवत असले तरी दुसरीकडे ऐत्याहासिक वास्तू पडून नामशेष होऊ लागल्या असल्याने इतिहास प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पायथ्याशी राहणार्या 'या' गावांना धोका : जोरदार पडणाऱ्या पावसाने पन्हाळ्याच्या तटबंदीचा व जिर्ण भिंतींचा थोडा थोडा भाग दरवर्षी कोसळत चालला आहे. याकडे पुरातत्व विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. चारदरवाजा परिसरात ढासळलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. याकडे पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पायथ्याशी राहणार्या, नेबापूर, सोमवारपेठ, इब्राहिमपूर इत्यादी गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नवीन बांधकाम करण्यात आलेल्या जिओग्रेट बांधकामावरून जे पडणारे धबधबासदृष्य पाण्यामध्ये ड्रेनीज मिश्रीत पाणी सोडले जात असून त्याचा मंगळवार पेठेत राहणार्या लोकांनी त्रास होत असल्याचे म्हटले आहे. तर गडावरून येणार्या पाण्यामुळे नियमित त्रास होत असल्याचे पायथ्याशी राहणार्या नागरीकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Panhala Fort Kolhapur : राजं...! मला वाचवा !! पन्हाळा गडाच्या ऐतिहासिक बुरुज आणि वास्तूंची दुरावस्था