कोल्हापूर - कोल्हापूर - रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर निवड होऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षांत शासनाकडून सर्व मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अतापर्यंत अनेक कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामांना 7 ते 8 वर्षे लागणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. भविष्यात रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी परवानग्या घ्याव्या लागल्या. त्या एकाच ठिकाणी घेता येण्यासाठी काही करता येईल का, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. दरम्यान, रायगड प्राधिकरणासोबतच पन्हाळा, विजयदुर्ग सह आणखी काही किल्ल्यांचे प्राधिकरण स्थापन करण्यासाठी सुद्धा आपण आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं.
संवर्धन जतन करायचं की परवानग्यांच्याच मागे लागायचे?
रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर निवड होऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र पहिले वर्षे केवळ विविध परवानग्या घेण्यासाठीच निघून गेले. त्यामुळे संवर्धन जतन करायचं की परवानग्यांच्याच मागे लागायचे असा वाटत होते. मात्र पुढच्या दोन वर्षांत विविध काम पार पडली आहेत. आत्तापर्यंत केवळ 5 टक्केच कामं झाली असून उर्वरित काम पार पडण्यासाठी जवळपास 7 ते 8 वर्षे लागतील असेही संभाजीराजेंनी म्हंटले असून शासनाकडून सर्व मदत मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
इतिहास संशोधकांना अभ्यास करायला संधी मिळणार
मागील 3 वर्षांपासून रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. यापूर्वी कधीही घडली नाहीत ती कामं सध्या पार पडत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या उत्खननात विविध पुरातन वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये महिलांच्या बांगड्या, दागिन्यांबरोबरच 200 ते 300 किलो वजनाचे शिवलिंग सुद्धा सापडले आहे. त्यामुळे अशा खूप पुरातन वस्तू आणि दागिने सापडल्याने इतिहास संशोधकांना अभ्यासासाठी संधी मिळणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्या
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून संवर्धनाला सुरुवात झाली आहे. मात्र गडावर कोणत्याही गोष्टीमध्ये बदल करायचा असेल तर विविध ठिकाणी परवानगी घेण्यासाठी जावे लागते. मात्र हे बंद होऊन एकाच ठिकाणी या सर्वच गोष्टींची परवानगी मिळावी. यामुळे अडथळ्यांवर मात करत असताना संवर्धन आणि जतन करण्याकडे दुर्लक्ष होणार नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.