कोल्हापूर - गिरीश कुबेर यांच्या 'रेनिसान्स स्टेट' या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. कुबेर यांच्या या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने ताब्यात घ्यावीत, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. शिवाय पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा निषेधसुद्धा त्यांनी केला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करावी
फेसबुकवरील पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहीतरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी, किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोकं करत असतात; यापैकीच एक हे असावेत. त्यामुळे 'रेनिसान्स स्टेट' या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत. सरकारने या संवेदनशील विषयामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी, अशी मागणीसुद्धा संभाजीराजेंनी केली आहे.
हेही वाचा - 'रेनिसान्स स्टेट' या पुस्तकावर बंदी घालावी, संभाजी ब्रिगेडची मागणी