कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी ते उपोषण करणार आहेत. कोल्हापूरतल्या ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर येत्या 24 फेब्रुवारीला समरजितसिंह घाटगे उपोषण करणार आहेत. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भातच त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
म्हणूनच उपोषणाला बसावे लागत आहे -
आज कोल्हापूरसह राज्यभरातील शेतकरी अडचणी मध्ये आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. अनेक जण आर्थिक संकटात आहेत. शेतकरी सुद्धा कर्जमाफीची अद्याप प्रतिक्षाच करत आहेत. एव्हढेच नाही तर कोरोनाकाळातील वीज बिलाचा तर सर्वात महत्वाचा मुद्दा आता समोर आहे. त्यांचे हे सर्व प्रश्न शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जाणून घेत ते सरकारपर्यंत पोहोचवले. मात्र, अद्याप याची सरकारने दखल घेतली नाही. म्हणूनच एक दिवसाचा लाक्षणिक उपोषणाला बसावे लागत असून त्याच्या माध्यमातूनतरी सरकारला जाग येते का हे पाहावे लागणार असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले.
गेल्या दोन महिन्यांपासून अनेक गावांना समरजित घाटगेंची भेट -
समरजित घाटगे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी संपूर्ण कोल्हापुर जिल्ह्याचा दौरा केला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी अनेक गावांना भेट देत तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांसह अनेक महिलांनी सुद्धा समरजित घाटगे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत असे या दौऱ्याला नाव देण्यात आले आहे. मात्र, या सरकारने अद्याप याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मुश्रीफ यांच्या त्या टीकेला समरजितसिंह घाटगे यांचे चोख प्रत्युत्तर -
समरजित घाटगे यांच्या शिवार संवाद यात्रेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हे केवळ नाटक सुरू आहे अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, टीका करण्याच्या निमित्ताने तरी त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळाले हे खूप आहे. शिवाय टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे हे प्रश्न सोडवा. तुम्ही दिलेला शब्द पाळा एव्हढेच मी त्यांना सांगेल असेही त्यांनी यावेळी म्हंटले.