कोल्हापूर - एफआरपीच्या तुकड्यावरून आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. जर राज्यकर्त्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाही केली तर तुमची दिवाळी कडवट करू, असा इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा - मुंबई बँक भ्रष्टाचाराबद्दल किरीट सोमैय्या गप्प का? राजू शेट्टी यांचा सवाल
राजू शेट्टी पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळवून देण्याचे साखर कारखानदारांच्या मनात नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने निती आयोगाला हाताशी धरून व्यापाऱयांचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम भाजपने केले. मात्र, भाजपच आता पुण्यात आंदोलन करत आहे. उसाची तोडणी झाल्यानंतर चौदा दिवसात सात टक्के एफआरपी, त्यानंतर पुढच्या चौदा दिवसात 20 टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात 20 टक्के द्यावी अशी शिफारस आयोगाने केली आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
- 'स्वाभिमानी'चे 7 ऑक्टोबरपासून नवे आंदोलन सुरू -
शेतकऱ्यांचे तुकडे होऊ नयेत यासाठी जनजागृतीपर जागर यात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केलेले नाही. त्यांना तत्काळ मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 7 ऑक्टोबरपासून 'जागर एफआरपीचा, आराधना शक्तीस्थळांची' असं नवे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. उसाच्या या पार्टीसाठी घटस्थापनेपासून दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. हे आंदोलन वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर, आदमापुरातील बाळूमामा यांचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी फिरून हे आंदोलन होणार आहे. त्याची सांगता जेजुरी येथे 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
- 19 ऑक्टोबरला २० वी उस परिषदेची घोषणा -
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऊस परिषद घेण्यास काही अडचणी आल्या. त्यामुळे ऊसाला दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका परिस्थिती लक्षात घेऊन स्पष्ट केली होती. मात्र, सध्या कोरोनाचे प्रमाण कमी आले आहे. कोणाची परवानगी मिळू अगर नाही मिळो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० वी ऊस परिषद 19 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणार आहे.
या ऊस परिषदेसाठी कोणाकडे परवानगी मागणार नाही. या ऊस परिषदेत एफआरपीसह पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला जाईल. तसेच राज्य सरकारने तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला आहे. जर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाही केली, तर त्यांची दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही. राज्यातील सर्व मंत्र्यांची दिवाळी कडवट करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हेही वाचा - अलमट्टी धरणासंदर्भात राजू शेट्टी घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट