कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यात बाराही महिने पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्यामुळे या अभयारण्याला एका विशिष्ट लोगोद्वारे ओळख मिळावी यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिवसाचे औचित्य साधून वन्यजीव विभाग यांच्यावतीने कोल्हापूर येथे 'राधानगरी अभयारण्य लोगो'च्या विविध लोगोचे प्रदर्शन भरवले होते. त्याद्वारे एका लोगोची निवड करण्यात आली असून आता यापुढे राधानगरीची या आकर्षक लोगोमुळे राधानगरीला आपली विशेष ओळख मिळाली आहे. नुकतेच या लोगो स्पर्धेचे कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन येथे बक्षीस वितरण पार पडले. यामध्ये मुंबईमधील संजयकुमार दरमावर यांनी साकारलेल्या लोगोला पाहिले पारितोषिक देऊन त्यांनी बनविलेल्या लोगोची निवड करण्यात आली.
'बायसन नेचर क्लब'चा मोठा पुढाकार -
आज जगात बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे, पर्यटन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाढ होणार उद्योग आहे. जंगल पर्यटनाकडे अलीकडे पर्यटकांचा ओढा खूप वाढला आहे. राधानगरी हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य आहे. येथे बाराही महिने वेगवेगळे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या पर्यटन नगरीला आपली एक वेगळी ओळख असावी म्हणून वन्यजीव विभागाने विविध उपक्रम आखले आहेत. त्यामधीलच एक म्हणजे लोगो स्पर्धा आणि प्रदर्शन. या स्पर्धेमधून विजेते ठरलेल्या लोगोसाठी आकर्षक बक्षिस देण्यात आली असून, विजेता लोगो इथून पुढे राधानगरी अभयारण्याची ओळख बनला आहे. विशेष म्हणजे राधानगरी मध्ये गेले 10 वर्ष येथील 'बायसन नेचर क्लब'तर्फे सुद्धा पर्यटन वाढीबाबत अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. त्यांचे सुद्धा यामध्ये मोठे योगदान राहिले आहे. क्लब तर्फे जंगल सफारी, ट्रेकिंग, कॅम्प असे उपक्रम राबवले जातातच त्याच सोबत काजवा महोत्सव, फुलपाखरू महोत्सवामुळे देशांतर्गत पर्यटनामध्ये राधानागरीची एक वेगळी ओळख बनून राहिली आहे.
राधानगरी अभयारण्य पर्यटन विकासाचे प्रतीक म्हणून लोगोचे अनन्यसाधारण महत्व -
लोगो प्रदर्शनानंतर बक्षीस वितरण समारंभात राधानगरी अभयारण्य पर्यटन विकासाचे प्रतीक म्हणून लोगोचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे आमदार प्रकाश अबीटकर यांनी म्हंटले. शिवाय या लोगोमुळे एक विशेष ओळख सुद्धा आता मिळणार असल्याचे त्यांनी म्हंटले.
लोगो स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -
लोगो स्पर्धेत जवळपास 108 जणांनी सहभाग घेतला होता. या सर्वांच्या लोगोमधील निवडक लोगोचे शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई येथील संजयकुमार दरमावर यांच्या लोगोला अनेकांनी पसंती दिली. शिवाय त्यांच्या या लोगोला प्रथम क्रमांक देण्यात आला असून त्यांच्या लोगोची राधानगरी अभयारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रसन्न जगताप यांना द्वितीय क्रमांक तर निर्मिती ग्राफिक्स कोल्हापूर यांना तृतीय क्रमांक मिळाला. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, कोल्हापूर वनवृत्तचे मुख्य वन्यजीव संरक्षक क्लेमेन्ट बेन, कोल्हापूर वन्यजीवचे मुख्य वन्यजीव रक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सम्राट केरकर आदी उपस्थित होते.