कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज आणि उद्याही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यात 'रेड अलर्ट'ही जारी करण्यात आला आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर
सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. दरम्यान, या नदीने धोका पातळी गाठली आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे, तसेच शहरातील विविध ओढ्यांना पुर आल्यामुळे काही सकल भागांमध्ये पाणी शिरले आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या परिस्थितीची आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह मनपा उपायुक्त निखिल मोरे यांनी पाहणी केली आहे. यावेळी नागरिकांनी कादंबरी बलकवडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सद्या नेमकी काय परिस्थिती आहे, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.