कोल्हापूर - वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला दरवर्षी आपल्या घरानजीक असलेल्या वडाच्या झाडाची पूजा ( Vat Purnima Festival ) करत असतात. काही ठिकाणी जवळच असते तर काही ठिकाणी वडाचे झाड नसल्याने अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी किवा छोटे झाडच घेऊन येत असतात. शहरात अनेक भागात वडाच्या झाडाच्या फांदीचेच पूजन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकीकडे सण साजरे करत असतानाच आपण पर्यावरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत स्वतः एक निसर्गसेवक बनू शकतो. कारण जी छाटलेली फांदी आपण घरी आणली असते. त्याच फांदीपासून आपण वडाची रोपे तयार करू शकतो आणि काही वर्षातच त्या रोपाला मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहू ( Planting of banyan tree ) शकतो. पाहुयात यावरचाच हा विशेष रिपोर्ट..
दरवर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात छाटलेल्या वडाच्या रोपांची विक्री - दरम्यान, वटपौर्णिमेनिमित्त सर्वच स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात. त्यासाठी काहीजणी घराजवळच असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करतात तर अनेकांना बाजारात विक्रीसाठी आलेली झाडाची छाटलेली फांदी आणून त्याची पूजा करावी लागते. वटपौर्णिमेनिमित्त रस्त्याकडेला बरेच विक्रेते वडाच्या छोट्या फांद्या छाटून त्या विक्रीला ठेवताना आपण पाहिल्या आहेत. याच छाटलेल्या फांद्यांची वडाची रोपे करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो असे पर्यावरणप्रेमी अभिजीत वाघमोडे यांनी म्हटले आहे. शिवाय यासाठी काहीही खर्च नसून आपण निसर्गाचे एक सर्वात मोठे सेवक बनू शकतो असेही ते म्हणाले.
वडाच्या छाटलेल्या फांद्यापासून रोपे कशी बनवाल? - छाटलेल्या वडाच्या फांद्यांची रोपे कशी तयार करायची. याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अभिजीत वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी वडाच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या लागणार आहेत. यासाठी कोणतेही वडाचे झाड तोडायचे नाही, तर तोडलेल्या झाडांच्या फांद्या वापरायच्या आहेत. पावसाळ्यापूर्वी वीज कंपनीकडून, महानगरपालिकेकडून उंच वाढलेली झाडे अपघात टाळण्यासाठी छाटण्यात येतात. शिवाय वटपौर्णिमेदिवशी तर हमखास अनेक महिला फांद्या विकत आणतात. त्याच फांद्या यासाठी लागणार आहेत. त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करून आपण घरच्या घरी वडाच्या झाडाची रोप तयार करू शकता.
अशी करा घरीच रोपे तयार -
1) सर्व छाटलेल्या वडाच्या फांद्या गोळा करून त्याचे एक ते दीड फुट लांबीचे कटिंग करून घ्या. शक्यतो एकसमान व सरळ फांद्याचे कटिंग असावेत. फांदीची सर्व पाने काढून टाका.
2) ह्युमिक ऍसिडची योग्य मात्रा पाण्यात मिसळून त्यामध्ये वडाच्या सर्व कट केलेल्या फांद्या 5 ते 6 तास भिजवून ठेवा. यामुळे मुळ्या फुटण्याचे प्रमाण वाढते व रोपाला फुटवे पण लवकर फुटतात.
3) या सर्व कटिंग केलेल्या वडाच्या फांद्या बुरशीनाशक पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी (अर्धा तास) बुडवून ठेवू शकता. मातीत जाणाऱ्या कटिंगच्या भागाला कोरफड गर लावू शकता. त्या कट केलेल्या फांद्या प्लॅस्टिक पिशवीत जसे की, टाकाऊ दुधाची पिशवी, अर्धी कापलेली पाण्याची बाटली मध्ये लावू शकता.
4) या सर्व कटिंग केलेल्या वडाच्या फांद्या माती, शेणखत व थोडी वाळू या मिश्रणात लावू शकता. जेणेकरुन योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकेल व बुरशीपासून नवीन रोपाचे संरक्षण होईल.
5) तसेच कटिंग केलेल्या फांद्या या 4 ते 5 इंच जमिनीत पेरून त्या छाटलेल्या फांदीच्या शेंड्याला शेणाचा गोळा लावू शकता किंवा घट्ट प्लॅस्टिक गुंडाळू शकता.
6) या पद्धतीने सर्व रोपे तयार करून ती पेरल्यानंतर त्यातील ओलावा कायम राहावा यासाठी हे सर्व सावलीत ठेवावेत. ओलावा कायम राहण्यासाठी कोकोपीटचा वापर ही करू शकता आणि स्प्रे पद्धतीने सतत या रोपांवर पाणी मारू शकता.
7) या सर्व फांद्यांना साधारण 15 ते 20 दिवसात नवीन फुटवे फुटतात. काही फांद्यांना ना वेळ ही लागू शकतो. फुटवे फुटल्यानंतर नवीन पानांची हळूहळू वाढ होऊ लागेल.
8) आपल्याला मग ही पाने फुटलेली वडाची कटिंग्ज बाहेर काढून मोठ्या ग्रोबॅगमध्ये शिफ्ट करता येतील. हे शाखीय प्रजनन मधून तयार झालेले रोप शक्यतो. थोडे मोठे झाल्यावर तुम्ही त्याचे रोपण करावे. म्हणजे त्याची जगण्याची शक्यता वाढते.
9) वड, पिंपळ, नांद्रुक ही निसर्गातील महत्वाची व डेरेदार वाढणारी झाडे आपण घरच्या घरी या शाखीय पद्धतीने तयार करू शकतो.
कोणालाही अशाच पद्धतीने एक निसर्गमित्र व्हायचे असेल तर यांच्याशी साधा संपर्क - आपण सर्वजण, इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक निसर्गसेवक आहोत. वरीलप्रमाणे कृती करून वडाच्या छाटलेल्या फांद्यांची रोपे झालेली पाहणे खुपच आनंद देणारी गोष्ट आहे. गतवर्षी जवळपास 90 ते 100 रोपे बनविण्यात आली होती. त्यातील अनेक रोपं सद्या निसर्गामध्ये एकरूप होऊन नवीन आयुष्य जगत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिला यापद्धतीने रोपे बनवून निसर्गमित्र होऊ शकतात, असेही "वर्ल्ड फॉर नेचर" कोल्हापूरचे अभिजीत वाघमोडे यांनी म्हटले आहे.