कोल्हापूर - शहर व जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. सद्याची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली असून पावसाचा जोर असाच राहिल्यास काही तासांतच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ग्राह्य धरून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची स्थिती-
1) मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवर येल्लुर गावाजवळ 1 फूट पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे.
2) कुंभी धरणातून एकूण 780 cusec विसर्ग सुरू आहे.
किरवे येथे देखील कोल्हापूर गगनबावडा रस्तावर पाणी आल्याने रास्ता कळे येथून पूर्ण बंद केला आहे.
3) गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असून नीलजी व ऐनापूर हे दोन बंधारे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गवर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे.
4) काल संध्याकाळी 7 वाजता फोंडाघाट मार्गावर दाजीपूर जवळ पठाण पूल येथे झाड कोसळून तब्बल 4 तास वाहतूक ठप्प झाली होती. रात्री 12 वाजता प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व वाहानधारकांनी अथक प्रयत्नातून झाड दूर करून वाहतूक सुरु केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
5) पन्हाळा तालुक्यातील माजगाव पोर्ले पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
6) शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कासारी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. बर्की गावात जाणारे पुलावर पाणी आले असून बर्की गावाचा संपर्क तुटला आहे. मौजे अणुस्करा मार्गी पाय वाट चालू आहे.
7) कोगे गावातील नवीन पुलावर पाणी आल्याने या मार्गावरून वाहतूक बंद
8) करवीर तालुक्यातील महे पूल पाण्याली गेला असून बीड, शिरोली, सातेरी, सावरवाडी वाहतुक बंद झाली आहे.
9) खोची दुधगाव बंधारा पाण्याखाली गेला असुन, या मार्गे सांगलीला जाणारी वहातुक बंद आहे.
राज्य शासनाकडून खबरदारी-
2019 मध्ये कोल्हापुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीची पूनर्रावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच यंदा राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पावसाळ्यापूर्वीच कर्नाटक सरकारशी बोलणी करण्यात आली आहेत. त्यानुसार दोन्ही राज्याकडून अलमट्टी धरणात येणाऱ्या आणि सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग याबाबत माहिती वेळेवर देण्यासंदर्भातील बोलणी झाली आहेत. ज्यामुळे कोल्हापूर परिसरात पूरस्थिती निर्माण होणार नाही.