कोल्हापूर - माझ्या आमदारकीच्या दहा वर्षात मी जनतेची सेवा केली आहे. मी दोनवेळा आमदार झालो. तर महापालिका निवडणुकीत संजय पवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मात्र, दुसऱ्यावर टीका करण्यात ते पटाईत आहेत. आज जे मला गद्दार म्हणतात त्यांच्याविषयी सगळयांना माहित आहे. माझ्या निवडणकीत कोण गद्दारी केली ही जनता ओळखून आहे. आणि मला मी प्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र कोणाला देण्याची गरज नाही, असे म्हंणत संजय पवार यांचा खरा चेहरा जिल्ह्यातील जनतेला माहित आहे, असा पलटवार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
दोन्ही खासदार अनुपस्थित का राहिलेत ?- खासदार विनायक राउत यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित मेळाव्याला शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार अनुपस्थित का राहिलेत? याचा गांभीर्याने विचार करावा असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला आहे. तसेच, अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे ही राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. विनायक राउत यांच्याशी माझे कोणतेही वैर नाही. पण त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एनडीएशिवाय निवडून येउन दाखवावे असे आव्हान क्षीरसागर यांनी राऊत यांना दिले आहे.
खरी शिवसेना कोणाची हे लवकरच स्पष्ट होईल - तसेच खरी शिवसेना कोणाची हे लवकरच स्पष्ट होईल. कोल्हापुरात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दहा हजार शिवसैनिकांचा मेळावा घेत आम्ही पक्षाच्या बांधणीला लागणार आहोत. आम्हाला जिल्ह्याची प्रगती करायची आहे. आम्ही संयमाने पुढे जात आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा माझा वाद हा राजकीय होता. मी पाठीमागून वार करणारा माणूस नाही. चंद्रकांत पाटील यांच्याशी समोरासमोर वाद झाला. पक्षाचे हित बघून मी टीका करायचो असही ते म्हणाले आहेत.
शिवसेनेला डॅमेज करण्याचे काम काही मंडळी करत आहेत - मला २०१९ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मला कोणाचा पाय ओढायची सवय नाही. मी गोडबोल्या नाही. जीभेवर साखर आणि तोंडावर बर्फ असे मला वागता येत नाही. मात्र, संजय पवार शांत डोक्याचे आहेत ते त्यांना लागू पडते. मला नाही असे ही ते यावेळी म्हणाले आहेत. तर शिवसेना माझी आहे आणि अठरापैकी चौदा खासदार आमच्यासोबत आहेत. राजकारणात टीका करायची पातळी असते. ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना बदनाम करायचा प्रकार सुरू आहे. शिवसेनेला डॅमेज करण्याचे काम काही मंडळी करत आहेत, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
हेही वाचा - फडणवीसांनी आज माइक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका