कोल्हापूर - आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह असल्याशिवाय आता पुन्हा एकदा कर्नाटकात (Karanataka) प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात (Karanataka) जाणाऱ्या प्रवाशांना पुन्हा चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियन्ट हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळपासून कर्नाटक सीमेवरील कोगणोळी टोल नाक्याच्या अलीकडे कर्नाटक प्रशासनाचे पुन्हा चेक पोस्ट उभारले आहेत.
कर्नाटक प्रशासन सतर्क
कोरोनाच्या नव्या व्हेरियन्टच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच सतर्कता बाळगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा काळजी घेण्याचे तसेच निर्बंध घालण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. आज सकाळपासून पुन्हा एकदा कर्नाटक हद्दीत चेक पोस्ट उभारण्यात आले असून प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोना
नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटक मध्ये आलेल्या दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोना नेमका कोणत्या व्हेरियन्टचा आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नसती तरी त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नियम अधिक कडक केले आहेत. आता कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येकाकडे आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे.
हेही वाचा - CNG Rate Hike : सीएनजी दरात दहा महिन्यांत चौदा रुपयांची वाढ; रिक्षा, टॅक्सी चालक नाराज